वाहनासह सव्वा सहा लाखांचा दारुसाठा जप्त! संचारबंदीतही दारुची अवैध वाहतूक

समुद्रपूर : जिल्ह्यात संचारबंदी असतानाही नागपूरकडून चंद्रपूरकडे दारुची वाहतूक होत असल्याची माहिती समुद्रपूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी महामार्गावर नाकेबंदी करुन वाहन अडविले असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारुचा साठा आढळून आला. पोलिसांनी वाहनासह ६ लाख २४ हजार रुपयांचा दारुसाठा जप्त करुन एकाच अटक केली आहे.

फिरोज खान शफीउल्ला खान (3५) रा.खापरी नाका, नागपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा नागपूर येथून चारचाकी वाहनात देशी-विदेशी दारुचा साठा
भरुन चंद्रपूरकडे जात होता. समुद्रपूर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी महामार्गावर नाकेबंदी करुन वाहन अडविले. या वाहनात 3 लाख २४ हजारांचा दारुसाठा आणि 3 लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण ६ लाख २४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी फिरोज खान शफीउल्ला खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही कारवाई समुद्रपूरचे पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात विरेंद्र म्हस्के, निलेश पेटकर, मनोज कोसुरकर, समीर कुरेशी यांनी केली. तालुक्यात संचारबंदीमुळे पोलिसांनी बंदोबस्त आणखीच मजबूत केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here