Home ◼️ संपादकीय पालकांनी मुलांशी संवाद वाढविणे गरजेचे : विशाखा दुपारे ; पवनार येथे मासिक...

पालकांनी मुलांशी संवाद वाढविणे गरजेचे : विशाखा दुपारे ; पवनार येथे मासिक पाळी जनजागृती कार्यक्रम

पवनार : आजच्या धावपळीच्या जीवनात पालक आणि मुलांमधील संवाद कमी होत चालला आहे. यामुळे किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक तणाव, चुकीचे संबंध आणि सामाजिक समस्या वाढताना दिसत आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांचे मित्र बनून त्यांच्याशी खुल्या मनाने संवाद साधणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन महिला व बाल विकास समुपदेशक, वन स्टॉप सखी सेंटरच्या विशाखा दुपारे यांनी केले.

आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट, वर्धा यांच्या वतीने जागतिक मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन दिनानिमित्त बुधवारी (ता. २८) पवनार येथे आयोजित जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी सीएलएफ अध्यक्षा विद्या अदमाने,
सीमा ठाकूर, अमोल लांडगे, अनिकेत टेभूरणे, दिव्या टिप्रमवार, कल्याणी होलगारे, रुपा आवाडे, मीनाक्षी कैरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात गावामध्ये मासिक पाळी स्वच्छतेबाबत जागृती रॅलीने करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना विशाखा दुपारे यांनी महिलांचे आरोग्य, किशोरवयीन मुलांचे मानसिक बदल, सोशल मीडियाचा प्रभाव, सायबर गुन्हे, प्रेमसंबंध, अल्पवयीन मुलींची सुरक्षितता आणि कौटुंबिक हिंसाचार यांसारख्या विषयांवर सविस्तर माहिती दिली. आपण मुलांना शिक्षण, मोबाईल आणि इतर सुविधा देतो; मात्र त्यांच्या भावना, समस्या आणि मानसिक स्थिती समजून घेण्यासाठी वेळ देत नाही. अनेक मुलं घरात आपल्याला कोणी ऐकत नाही, अशी भावना मनात ठेवतात. त्यामुळे ते बाहेरील व्यक्तींवर भावनिकदृष्ट्या अवलंबून राहू लागतात, असे त्या म्हणाल्या.

अल्पवयीन मुलींमध्ये वाढणाऱ्या प्रेमसंबंधांच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, समाजामध्ये अनेक प्रकरणे अशी दिसून येतात, ज्यामध्ये अल्पवयीन मुली चुकीच्या नात्यांमध्ये अडकतात. त्यानंतर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल होतात आणि अनेक कुटुंबांवर त्याचे गंभीर परिणाम होतात. त्यामुळे पालकांनी मुलांशी सातत्याने संवाद साधून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला पवनार युनिटमधील महिला बचत गट सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!