
पवनार : शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवा क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांना अखेरचा निरोप देताना पवनार परिसर शोकमग्न झाला. आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पवनार येथील त्यांच्या शेतात अत्यंत भावपूर्ण वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दत्ताजी मेघे यांच्या पार्थिवाला त्यांच्या सुपुत्रांनी सागर मेघे आणि समीर मेघे मुखाग्नि दिला. यावेळी उपस्थित हजारो नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. या अंत्यसंस्कारावेळी देश-राज्य पातळीवरील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार अमर काळे यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दत्ताजी मेघे यांनी आयुष्यभर शिक्षणसंस्था उभारून हजारो विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य केले. त्यांच्या जाण्याने समाजसेवा आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अंत्यसंस्काराच्या वेळी पवनार आणि परिसरातील हजारो नागरिक, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी अश्रुपूर्ण डोळ्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.

























































