

वर्धा : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी जिल्हा वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली असून, विविध ठिकाणी एकूण १० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मा. अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ११ एप्रिल रोजी विशेष मोहिमेदरम्यान कारंजा, सांवगी, हिंगणघाट, आर्वी, सेवाग्राम, पुलगाव आणि समुद्रपूर या ठिकाणी तपासणी नाके लावण्यात आले होते. या वेळी दारूच्या नशेत वाहन चालविताना आढळलेल्या चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान विविध भागातील वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी त्यांची नावे नोंदवून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ही विशेष मोहीम नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी वाहन चालविताना हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा, तसेच दारू पिऊन वाहन चालविणे टाळावे, असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेकडून करण्यात आले आहे.






























































