
वर्धा : जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात कडक भूमिका घेत स्थानिक गुन्हे शाखेने गांजाची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर धडक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या स्पष्ट आदेशानुसार राबविण्यात आलेल्या या मोहिमेत समुद्रपूर तालुक्यातील जाम वॉर्ड क्रमांक ३ येथून गांजाची विक्री करताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.
दि. २२ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस स्टेशन समुद्रपूर हद्दीतील सचिन भगवानजी सहारे (रा. जाम, ता. समुद्रपूर) यांच्या राहत्या घरी छापा टाकला. यावेळी सचिन सहारे व त्याचा एक अल्पवयीन साथीदार गांजाची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या ताब्यातून १ किलो २७ ग्रॅम गांजा, सुजुकी अॅक्सेस १२५ मोपेड (क्र. एमएच ३४ बीडब्ल्यू ९५४७) तसेच दोन मोबाईल फोन असा एकूण १ लाख ५५ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपी, त्याचा अल्पवयीन साथीदार तसेच गांजा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींविरोधात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, गांजाचा पुरवठा कुठून होत होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, वर्धाचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, पोलीस अंमलदार अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, सागर भोसले, अभिषेक नाईक यांनी केली.


























































