
आर्वी : संपूर्ण शहराला हादरवून सोडणारी एक थरारक घटना बुधवारी (ता. २१) सकाळी येथील मुख्य बाजारपेठेत घडली. मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या एका युवकाच्या अमानुष हल्ल्यात संजय राऊत व रामाजी वांगे या दोन वृद्धांना जीव गमवावा लागला. या घटनेत आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, या घटनेमुळे संपूर्ण आर्वी शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवक मयुरेश ऊर्फ मातेश लाडके हा पूर्णतः नग्नावस्थेत अचानक बाजारपेठेत आला. गर्दीने फुललेल्या बाजारात तो हातात लाकडी दंडुका घेऊन उभा झाला आणि विचित्र वर्तन आणि आरडाओरड करू लागला. सुरवातीला नागरिकांनी त्याला शांत करण्याचा आणि बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा उन्माद वाढला आणि त्याने आजूबाजूच्या लोकांवर बेछूट हल्ला चढविण्यास सुरवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले.
त्याचवेळी आरोपीने दोन वृद्ध नागरिकांवर निर्दयपणे लाकडी दंडुक्याने प्रहार केले. यात ९० वर्षीय संजय राऊत यांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेले ७० वर्षीय रामाजी वांगे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत आणखी एक नागरिक गंभीर जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी मोठ्या धाडसाने आरोपीला पकडले. जमलेल्या गर्दीने त्याला चोप देत त्याचा उन्माद आवरण्याचा प्रयत्न केला आणि लाकडी दंडुका हिसकावून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, जमावाने त्याला एका लाकडाला बांधून शहरातून पोलिस ठाण्यात आणले. या घटनेमुळे नागरिकांत चांगलाच रोष होता. जमावाकडून झालेल्या मारहाणीत आरोपीही जखमी झाला असून, त्याच्यावरही वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे. घटनेच्या सर्व पैलूंवर चौकशी केली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
तणावामुळे पोलिस बंदोबस्त
घटनेची माहिती मिळताच आर्वी पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. हजारो नागरिक घटनास्थळी जमा झाल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून, घटनेचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, एवढ्या संवेदनशील ठिकाणी आणि गर्दीच्या बाजारात ही घटना घडल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून, शहरातील सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.




























































