वादळवा-यासह पावसाची शक्यता! नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

वर्धा : भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात दि.7 ते 9 सप्टेंबर दरम्यान वादळी वारा, वीज गर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असून जिल्ह्यात या कालावधीत येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणांची सरासरी पातळी 84 टक्के पेक्षा जास्त झालेली असून मुसळधार पाऊस पडल्यास धरण 100 टक्के भरल्यामुळे धरणांचे दरवाजे उघडण्यात येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी विशेषत: शेतक-यांनी आवश्यक काळजी घ्यावी. वीज गर्जना होत असतांना शक्यतो घरातच राहणे आवश्यक असून झाडाखाली उभे राहू नये. नदी व नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असेल तर धाडस करुन कुठल्याही प्रकारे पुल ओलाडण्याचा प्रयत्न करु नये. नदी तलाव व धरणे या ठिकाणी नागरिकांनी विशेषत: युवकांनी पाण्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करु नये.

कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करु नये. नदी धरणाकाठी वास्तव्याला असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्यास वेळेत सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नये. धोकादायक ठिकाणी अथवा दरड कोसळणा-या ठिकाणी थांबू नये. घडलेल्या आपत्तीची माहिती तात्काळ जिल्हा तसेच तालुका नियंत्रण कक्षास द्यावी, वेळोवेळी शासनाकडून देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करावे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here