भरधाव कार झाडावर धडकली! एक ठार , तीन जण जखमी; कारचालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

हिंगणी : गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात कारचालकाचे स्टिअरिंगवरून नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन धडकली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात २५ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास बोरधरण येथे झाला. रोहण शेखर सातपुते (२५ रा. हिवलीनगर, नागपूर) असे मृत युवकाचे नाव आहे. तर, अमित सायरे, प्रवीण सायरे आणि अभिषेक कामडी अशी जखमींची नावे आहेत.

नागपूर येथील जयताळा परिसरातील रहिवासी अमित बंडू सायरे हा त्याच्या एम.एच. ३१ सी.एन. ७२३५ क्रमांकाच्या कारने प्रवीण सुरेश सायरे, अभिषेक संजय कामडी व रोहण शेखर सातपुते यांच्यासोबत हिंगणी येथे लग्नपत्रिका देण्यासाठी आले होते. लग्नपत्रिका दिल्यानंतर ते पहाटेच्या सुमारास बोरधरण व्हाया नागपूरला जाण्यासाठी निघाले. दरम्यान, बोर टायगर रिसॉर्ट जवळ त्यांच्या भरधाव कारसमोर अचानक गाय आडवी आली. गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्यालगतच्या झाडावर धडकली, धडक इतकी भीषण होती की कारच्या समोरील भाग चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलिस अपघातस्थळी पोहोचले. जखमींना उपचारार्थ श्रामीण रुणालयात दाखल केले. याप्रकरणी कार चालक अमित सावरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here