कारच्या बोनेटवरून ‘फुटबॉल’ सारखा उडला भाजी विकणारा मुलगा! पावडे चौकात अपघात; नुकसानभरपाई म्हणून दिले सात हजार

वर्धा : वेळ दुपारी दोन वाजताची रस्त्यावर नागरिकांची गर्दी होती. काही जण भाजीपाला घेत होते अन्‌ अचानक एक पांढऱ्या रंगाची कार थेट रस्त्याकडेला बसून असलेल्या भाजीपाल्यावर चढली अन्‌ क्षणार्धात भाजीविक्रेता कारच्या बोनेटवरून फुटबॉलसारखा उडला. भाजीविक्रेत्या मुलाला किरकोळ मारही लागला. मात्र, कारमालकाने नुकसान झालेल्या भाजीपाल्याची भरपाई दिल्यानंतर प्रकरण मिटले..

मंगळवारी दुपारी १.४४ वाजताच्या सुमारास पावडे नर्सिंग होम समोरील रस्त्याच्या कडेला (एम.एच. ३२ ए.एच. ६९४५) क्रमांकाची पांढर्‍या रंगाची कार थांबून होती. कारमधून एक व्यक्‍ती खाली उतरला आणि काही कामानिमित्त रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या इमारतीत गेला. दोन वाजताच्या सुमारास कारमधील स्टेअरिंग सिटवर बसून असलेल्या तरुणीने अचानक कार सुरू केली अन्‌ गिअर टाकताच समोर रस्त्याकडेला बसून असलेल्या भाजीच्या दुकानात शिरली. कारच्या चाकाने भाजीपाला चिरडला गेला. इतकेच नव्हेतर खुर्चीवर बसलेला भाजीविक्रेता मुलगा बोनेटवरून थेट फुटबॉलसारखा दुसरीकडे जाऊन पडल्याने तो थोडक्यात बचावला.

अपघात होताच मोठा आवाज झाल्याने रस्त्यावरील नागरिक स्तब्ध झाले. घाबरलेली कारचालक तरुणी हुंदके देऊ लागली. काही वेळातच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. तरुणीचे वडील धावत आले. रस्त्याच्या मधात असलेली कार बाजूला करून भाजीपाला विक्रेत्याशी बोलून झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून ७ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर हे प्रकरण मिटले. अपघातस्थळावर रामनगर पोलिस दाखल झाले. मात्र, आपसात समझोता झाल्याने कुणीही तक्रार देण्यास पुढे न आल्याने पोलिसही आल्यापावली परतले. या घटनेने काही वेळ वाहतूक खोळंबली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here