अपघात पाहण्यास थांबला अन्‌ रुग्णवाहिकेने उडविले! सावंगी रुग्णालयात उपचार सुरू

वर्धा : दूध, दही विकून दुचाकीने घरी परत असतानाच रस्त्यावर झालेला अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या व्यक्तीच्या दुचाकीला भरधाव रुग्णवाहिकेने धडक दिली. यामध्ये व्यक्‍तीला गंभीर दुखापत झाली. हा अपघात पिंपळखुटा येथील तुळजापूर शिवारातून गेलेल्या आर्वी ते वर्धा रस्त्यावर झाला. याप्रकरणी १३ जुलै रोजी खरांगणा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

बाबाराव अजाबराव काळे (५५, रा. दाणापूर) हे दररोज सकाळी दूध, दही विक्री करण्यासाठी एम.एच. ३२ ए.टी. १०३४ क्रमांकाच्या दुचाकीने जातात. ते १२ रोजी आर्वी येथे गेले होते. दही व दूध विकून घरी परत येत असताना तुळजापूर शिवारात झालेला अपघात पाहण्यासाठी ते थांबले. दरम्यान आर्वीकडून भरधाव येणाऱ्या एम.एच, १४ सी.एल. १०३२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून बाबारावच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात बाबाराव गंभीर जखमी झाले. असून, त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले. जखमी बाबाराव यांच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. याप्रकरणी खरांगणा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर करीत असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here