जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘टॉक्सिलीझुमॅब इंजेक्शन’ संपले! गरजूंना बाजारपेठेत किमान ३९ हजार रुपये मोजावी लागतेय किंमत

वर्धा : अति गंभीर कोविड बाधितांसाठी नवसंजीवणी ठरणाऱ्या ‘टॉक्सिलीझुमॅब इंजेक्शन’चा जिल्हा सामान्य रुग्णालयातील साठा संपल्याने गरीब व गरजूंना हे इंजेक्शन बाजारपेठेतून खरेदी करण्याची वेळ ओढवणार आहे. या इंजेक्शनचा एक वायल किमान ३९ हजार रुपये किमतीचा असून, हे औषध जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध व्हावे, यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.

कोविडची एण्ट्री होताच भविष्यातील गरज लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांच्या कार्यकाळात टॉक्सिलीझुमॅब ४०० एमजी इंजेक्शनचे ४० वायल खरेदी करण्यात आले होते. अति गंभीर कोविड बाधिताला या औषधाची गरज असल्याची मागणी होताच इंजेक्शनची मागणी करणाऱ्याला पुरवठा करण्यात आला; पण सध्या हे महागडे इंजेक्शन जिल्हा सामान्य रुग्णालयातच नसल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले. इतकेच नव्हे तर या औषधाची खरेदी करण्यासह शासनाकडे मागणी नोंदविण्याकडेही टाळले जात असल्याने गरजू आणि गरीब कोविड बाधिताला मोठा आर्थिक फटका सहन करून हे औषध रुग्णालयाबाहेरून खरेदी करण्याची वेळ ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फुफ्फुसावरील सुज कमी करण्यासाठी उपयुक्त

एखाद्या गंभीर रुग्णाच्या फुफ्फुसावरील सुज वेळीच कमी न झाल्यास त्या रुग्णाचा तडकाफडकी मृत्यू होतो. असेच मृत्यू रोखण्यासाठी टॉक्सिलीझुमॅब इंजेक्शन उपयुक्त ठरत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

२७ हजार ५०० फेविपीरव्हिर

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाला ३६ हजार ४० इतक्या फेविपीरव्हिर या औषधाचा पुरवठा करण्यात आला होता. तर सध्या २७ हजार ५०० फेविपीरव्हिरचा साठा जिल्हा रुग्णालयात असल्याचे सांगण्यात आले.

रेमडेसिविर इंजेक्शन केवळ ७४०

गंभीर कोविड बाधिताचा रुग्णालयातील मुक्कामाचे दिवस कमी करण्यासाठी रेमडेसिविर हा अखेरचा उपाय नसल्याचे आरोग्य यंत्रणेतील काही तज्ज्ञ सांगत असले तरी गंभीर कोविड बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रेमडेसिविर या औषधाची मागणीही वाढली आहे. सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात ७४० रेमडेसिविर इंजेक्शन असून, ते गरजू रुग्णाला दिले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here