वर्धा जिल्ह्यात पाच वर्षात वीज पडून ५० जणांचा झाला मृत्यू! ग्रामीण भागात जनजागृतीची गरज; शासकीय मदतीचा मिळाला दिलासा

वर्धा : पूर्व मोसमी व मोसमी हंगामात ढगांचा गडगडाट होऊन वीज कोसळण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. अशा वीज मे महिन्यांपासून पडत असतात. मागील पाच वर्षांच्या काळात वीज कोसळून जिल्ह्यात तब्बल ५० लोकांचे प्राण गेले आहेत. यात महिलांसह पुरुषाचाही समावेश आहे. त्यामुळे वीज अटकाव यंत्रणांची संख्या वाढविण्याची आज नितांत गरज आहे.

जिल्ह्यात मागील काही वर्षापासून वीज अंगावर पडून अनेक शेतकरी, सामान्य नागरिक, मजूर, महिला, लहान मुलं, तसेच जनावरे दगावल्याच्या घटना घडत आहेत. या घटनेची नोंद तहसील प्रशासनाद्वारे जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागात केली जाते. २०१७ ते २०२१ या पाच वर्षांत तब्बल ५० जणांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने वीज पडून मृत्यू पावलेल्यांना शासनातर्फे प्रत्येकी चार लाखा रुपयांची आर्थिक मदत केली जाते. मृतांच्या नातेवाइकांना व जखमींना देखील शासनाकडून मदत केली गेली आहे. अनेक मृत्यू झाडाखाली, टेकडी खाली थांबल्याने झाले आहेत. वीज अंगावर पडू नये यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक अहे; परंतु अनेकजण पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबतात. अशी गफलत केल्याने मृत्यू ओढावतो. त्यामुळे वीज पडत असताना शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन होणे आवश्यक असते.

वीज पडू नये यासाठी शासनाने जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन हा विभाग स्थापला. मात्र, या विभागाने उभारलेल्या आधुनिक यंत्रणेचा फारसा उपयोग होत नसल्याचे वाढत्या घटनांवरून दिसून येते. खासकरुन ग्रामीण भागात जनजागृतीची गरज असल्याची अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे. नागरिकांनी परतीच्या पावसात काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here