

साहूर : शिधापत्रिकाधारकांना धान्य कमी देऊन फसवणूक करणाऱ्या साहूर येथील स्वस्तधान्य दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करावा, अशी मागणी सुमारे २०० नागरिकांनी शिवसेनेच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदनातून करण्यात आली.
साहूर येथील सुमारे २५० शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य दुकानातून शसकी धान्याचे वितरण केले जाते. मात्र, दुकानदारांची ग्राहकांसोबतची वागणूक अरेरावीची असून प्रत्येक शिधापत्रिका धारकांना दोन ते तीन किलो धान्य कमी देतात. ग्राहकांनी विचारणा केल्यास दुकानदार उद्धटपणाची वागणूक देतो. त्यामुळे आष्टी येथील पुरवठा अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता धान्य दुकान चालक दोषी आढळून आल्याने त्याचा परवाना तात्पुरता निलंबित केला असून दुकान सोसायटीला जोडून धान्याचे वितरण सुरू ठेवले आहे.
दुकानदाराने परवाना निलंबन रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून शिधाधारकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून तहसील कार्यालयाकडे अर्ज सादर केला असल्याची माहिती मिळाली आहे. पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांसोबत माझे संबंध जुळले आहे. आणि मला दुकाने परत मिळणारच असे तो आपल्या हितचिंतकांना सांगत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तहसीलदार व पुरवठा अधिकाऱ्यांनी त्याच्या निलंबनाची कारवाई रद्द करू नये, तर सखोल चौकशी करून त्याचा दुकान परवाना कायमस्वरूपी रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली, अन्यथा शिवसेना आंदोलन करणार असा इशारा विकास परणकर, सुरेश टरके, जरदद वरकड, विजय गावंडे, शरद गावंडे, हरीष लाड, रमेश मसरे, विनोद डोंगरे आदी उपस्थित होते.