

वर्धा : महाकाली धरण परिसरात फिरायला गेलेल्या नवदांपत्याळा चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी दांपत्याने सांगितलेल्या वर्णनावरून अटक केली. ही कारवाई खरांगणा पोलिसांनी केली.
आर्वी तालुक्यातील मासोद येथील अरविंद खवशी हे पत्नीसह महाकाली येथील धरण परिसरात फिरत असताना दोन अनोळखी युवक त्यांना भेटले. त्यांनी अरविंदला तू कुणाच्या पत्नीसोबत फिरत आहे. आम्ही गुंडे आहे, असे म्हणून चाकूच्या धाकावर विवाहितेच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेले. याप्रकरणी खरांगणा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांजवळ केवळ तक्रारकर्त्यांनी सांगितल्या प्रमाणे दोन्ही आरोपींचे स्केच होते.
त्या आधारे पोलिसांनी संशयित म्हणून करणसिंग भादा रा. तळेगाव यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू असताना त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनीलसिंग टाक यालाही ताब्यात घेण्यात आले. पोलीस कोठडीत आरोपींना पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी महाकाली येथील लुटमारीसह पिंपळखुटा येथील चोरीचीही कबुली पोलिसांना दिली. त्यांच्याकडून दोन प्रकरणातील ४० ग्रॅम सोन्याचा ऐवज, दुचाकी, चाकू असा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी गोकूळसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संतोष शेगावकर, पोलीस उपनिरीक्षक प्रपोद कुरसंगे, देवराव येनकर, अमर हजारे, प्रितम इंगळे, राजेश डाळ यांनी केली.