
हिंगणघाट : जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांची देखभाल, संवर्धन व परीक्षण करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या जिल्हा हुतात्मा स्मारक समिती, वर्धाच्या अशासकीय सदस्यपदी हिंगणघाट येथील सामाजिक कार्यकर्ते राम सुधीर देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
जिल्हा हुतात्मा स्मारक समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर राहणार असून जिल्हाधिकारी वर्धा हे उपाध्यक्ष म्हणून कार्य पाहणार आहेत. तसेच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद वर्धा, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद वर्धा आणि निवासी उपजिल्हाधिकारी वर्धा हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
अशासकीय सदस्य म्हणून राम सुधीर देशपांडे यांचा समावेश करण्यात आला आहे. सामाजिक क्षेत्रात सातत्याने सक्रिय राहून विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या देशपांडे यांच्या नियुक्तीचे हिंगणघाट परिसरातून स्वागत करण्यात येत आहे. तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

























































