Home ◼️ संपादकीय अवैध दारू धंद्यांनी घेतला विक्राळ आकार ; ग्रामीण ते शहरी भागापर्यंत अवैध...

अवैध दारू धंद्यांनी घेतला विक्राळ आकार ; ग्रामीण ते शहरी भागापर्यंत अवैध दारू धंद्यांचे जाळे ; व्यसनाच्या विळख्यात अडकत चालली युवकांची पिढी

वर्धा : जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरांमध्येही अवैध दारू विक्री आणि व्यसनाधीनतेचे प्रमाण दिवसेंदिवस भयावह स्वरूप धारण करत असून युवकांची संपूर्ण पिढी व्यसनाच्या दलदलीत अडकत चालल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे. गावोगावी, वस्त्यावस्त्यांमध्ये, शहरातील गल्लीबोळांमध्ये, महामार्गालगत तसेच सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यांमुळे सामाजिक वातावरण दूषित होत असून कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

काही वर्षांपूर्वी लपूनछपून चालणारे हे अवैध धंदे आता इतके बिनधास्त झाले आहेत की अनेक ठिकाणी दिवसाढवळ्या दारू विक्री सुरू असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात शेतशिवार, नदीकाठ, गावाबाहेरील झोपड्या आणि किराणा दुकानांच्या आडून हा व्यवसाय चालतो, तर शहरात झोपडपट्ट्या, रिकामे प्लॉट, चौक परिसर, पानटपऱ्या आणि हॉटेलांच्या आडून अवैध दारू विक्री होत असल्याचे नागरिक सांगतात.

धक्कादायक बाब म्हणजे अनेक भागांमध्ये शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी आणि धार्मिक स्थळांच्या परिसरातही अवैध दारू सहज उपलब्ध होत असल्याने पालक आणि महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अल्पवयीन मुलं आणि बेरोजगार युवक सहज या व्यसनाच्या आहारी जात असल्याने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. व्यसनामुळे चोरी, मारामाऱ्या, कौटुंबिक हिंसाचार, महिलांवरील अत्याचार, रस्त्यावर दहशत, अपघात आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे वास्तव आहे.

शहरातील अनेक भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत दारू पिऊन धिंगाणा घालण्याच्या घटना सामान्य झाल्या आहेत, तर ग्रामीण भागात शेतमजुरी आणि शेतीतील उत्पन्नाचा मोठा हिस्सा दारूत उडत असल्याने आर्थिक परिस्थिती कोलमडत चालली आहे. अनेक घरांमध्ये पुरुषांचे दारूचे व्यसन इतके वाढले आहे की घरातील किराणा, मुलांचे शिक्षण आणि आरोग्य याकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे.

पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वेळोवेळी कारवाईचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात काही दिवसांतच पुन्हा तेच अड्डे सुरू होत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. “छापे पडतात, बातम्या होतात, पण धंदे कायम सुरूच राहतात” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. काही ठिकाणी तर अवैध दारू विक्रेत्यांची इतकी दहशत आहे की नागरिक उघडपणे तक्रार करण्यासही घाबरत आहेत. “नेमके कोणाच्या संरक्षणाखाली हे धंदे चालतात?” असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.

रोजगाराच्या संधींचा अभाव, वाढता मानसिक ताण, सोशल मीडियाचा प्रभाव आणि सहज उपलब्ध होणारे व्यसन यामुळे युवक भरकटत चालले आहेत. शिक्षण घेणारे अनेक तरुणही व्यसनाच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी तर शाळकरी मुलांमध्येही गुटखा, दारू आणि इतर नशेच्या पदार्थांचे प्रमाण वाढल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

शासनाने केवळ कारवाईचा दिखावा न करता व्यसनमुक्ती मोहीम, युवकांसाठी रोजगार निर्मिती, क्रीडा सुविधा आणि कठोर अंमलबजावणी यावर भर देणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील काही वर्षांत संपूर्ण समाजव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

आज गरज आहे ती केवळ अधूनमधून छापेमारीची नाही, तर कायमस्वरूपी कठोर कारवाईची. गावोगावी आणि शहरातील गल्लोगल्ली सुरू असलेले हे अवैध दारू अड्डे वेळेत बंद झाले नाहीत तर व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकणाऱ्या युवकांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!