
वर्धा : शहरातील पटेल चौक परिसरात सुरू असलेल्या सट्टा-जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण ३६ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पटेल चौक येथील एस. के. पानठेल्याच्या मागील बाजूस काही जण सट्टा पत्तीच्या माध्यमातून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ३० एप्रिल रोजी पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचत छापा टाकला. यावेळी आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.
या कारवाईत समीर सलाम शेख (वय ३५) याच्यासह अन्य पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून रोख रक्कम, सट्टा पत्तीचे कागद, पेन तसेच मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वर्धा शहर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.


























































