Home ◼️ संपादकीय लग्नाच्या वरातीत पुतण्यानं काकासह चुलत भावाला संपवलं, आरोपी अल्पवयीन; काय घडलं?

लग्नाच्या वरातीत पुतण्यानं काकासह चुलत भावाला संपवलं, आरोपी अल्पवयीन; काय घडलं?

वर्धा : शहरात शनिवारी (ता. चार) रात्री एका लग्नसमारंभात रक्ताचा सडा पडला. जमिनीच्या वादातून पुतण्याने काका आणि चुलत भावावर चाकूने प्राणघातक हल्ला करत त्यांची जीवनयात्रा संपवली. वरातीच्या जल्लोषात घडलेल्या या भीषण शोकांतिकेमुळे लग्नाचे घर सुतकात बुडाले. महिला आश्रम परिसरातील हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण वर्धा शहर हादरून गेले आहे. आराेपीला पाेलिसांनी अटक केली.

प्रभाकर भलमे (वय ५०) आणि त्यांचा मुलगा नितीन भलमे (वय २४) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही मूळचे बरबडी येथील रहिवासी होते. शनिवारी (ता. चार) रात्री त्यांच्या एका नातेवाइकाचा विवाह सोहळा वर्धा शहरात सुरू होता. नवरदेव बोहल्यावर चढला होता आणि वऱ्हाडी मंडळी बॅण्डच्या तालावर नाचत होती. ही वरात जेव्हा महिला आश्रम परिसरातील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन पुढे निघाली, तेव्हा दबा धरून बसलेल्या अल्पवयीन पुतण्याने अचानक काका आणि चुलत भावावर चाकूने सपासप वार केले. यात दोघांचाही मृत्यू झाला.

भलमे कुटुंबात गेल्या अनेक दिवसांपासून संपत्ती आणि जमिनीवरून वाद सुरू होते. आठ महिन्यांपूर्वी देखील त्यांच्यात मोठे भांडण झाले होते. आरोपी मुलाने हे हत्याकांड करण्यासाठी आधीच कट रचला होता आणि त्यासाठी ऑनलाइन चाकू देखील मागवला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ माजली असून पोलिस तपास करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी येत तातडीने कारवाई केली.

उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू

हल्ल्यानंतर घटनास्थळी एकच धावपळ उडाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रभाकर आणि नितीन यांना तातडीने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी वेगाने हालचाली करत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

पोलिस अधीक्षकांकडून घटनास्थळी पाहणी

पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर, पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस निरीक्षक संतोष ताले यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठत परिस्थिती जाणून घेतली. तसेच कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!