

वर्धा : शहराच्या विकासाला अधिक गतिमान करण्याच्या उद्देशाने टॅक्स विभागाद्वारे शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट ठेवून प्रयत्न केले. ३१ मार्च रोजी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी ८२ लाख रुपये कर वसूल करण्यात आला. थकीत व सुरू असे एकूण नऊ कोटी ५० लाख स्पये टॅक्स वसुली झाली आहे. कर वसुलीत वर्धा नगरपरिषद नागपूर विभागातून द्वितीय क्रमांकावर असून आतापर्यंतची ऐतिहासिक कामगिरी असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
सुरू आर्थिक वर्षात वर्धा नगरपरिषदेला ११ कोटी ८१ लाख रुपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यामध्ये सुरु सहा कोटी ८७ लाख व थकीत चार कोटी ९३ लाख रुपयांचा समावेश आहे. शहरातील नागरी सुविधा अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने कर वसुली अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. थकीत व सुरू वर्षातील टॅक्स भरण्याकरिता जनतेला प्रवृत्त करण्याकरिता नगराध्यक्ष सुधौर पांगुळ यांनी थकीत करावर लागणाऱ्या व्याजातून (शास्ती) शहरवासीयांना दिलासा देण्याकरिता लागू केलेली अभय योजनेचा मोठा फायदा झाला.
शहरात जवळपास २८ हजार संपत्ती धारक असून कर भरण्याकरिता त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत नऊ कोटी ५० लाख रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. यामध्ये थकीत वर्षातील ८५ टक्के तसेच सुरू वर्षातील ७८ टक्के कर वसुली पूर्ण झाली आहे. ३१ मार्च रोजी एकाच दिवशी ८२ लाख रुपये कर वसुली झाली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात कर वसुली एका दिवसात कधीच झाली नाहो असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. कर वसुलीमध्ये नागपूर विभागातून वर्धा द्वितीय स्थानावर असल्याचेही सांगण्यात येत आहे. यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी कर विभागाच्या प्रमुख प्रयोजन नेमिनिवर तसेच कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.
























































