Home ◼️ संपादकीय भव्य शोभायात्रेनंतर सेवाभावी कार्यकर्त्यांचा सन्मान ; बजरंग दलाच्या वतीने कृतज्ञतेचा सोहळा

भव्य शोभायात्रेनंतर सेवाभावी कार्यकर्त्यांचा सन्मान ; बजरंग दलाच्या वतीने कृतज्ञतेचा सोहळा

पवनार : हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर बजरंग दल शाखा पवनारच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य शोभायात्रा काढून हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक व धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या शोभायात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शोभायात्रेत विविध ठिकाणी भक्तांसाठी लंगरचे आयोजन करण्यात आले होते. पाण्याची, सरबताची तसेच अल्पोपहाराची व्यवस्था करून अनेक सेवाभावी कार्यकर्त्यांनी निःस्वार्थ भावनेतून योगदान दिले. यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत, पूजन आणि सेवाकार्याचे उपक्रम राबविण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

या पार्श्वभूमीवर बजरंग दलाच्या वतीने या सेवाभावी कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. पवनार येथील पुरातन हनुमान मंदिर परिसरात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी शोभायात्रेत सक्रिय सहभाग घेणारे, लंगरचे आयोजन करणारे तसेच विविध प्रकारे सहकार्य करणाऱ्या सत्कारमूर्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सेवाभावी वृत्तीचे महत्त्व अधोरेखित करत अशा सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांमुळे समाजात एकात्मता व बंधुभाव वाढीस लागतो, असे मत व्यक्त केले. हनुमान जयंतीसारख्या धार्मिक सणांच्या माध्यमातून युवकांमध्ये सेवा, शिस्त आणि संघटनेची भावना दृढ होते, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला बजरंग दलाचे जिल्हा संयोजक बबलू राऊत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!