
नवी दिल्ली : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा आणखी एक झटका बसला असून, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात सुमारे १९५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम हॉटेल, केटरिंग व्यवसाय तसेच लहान-मोठ्या उद्योगांवर होणार आहे. तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार, दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत २,०७८.५० रुपये झाली आहे. यापूर्वी हा सिलिंडर १,८८४.५० रुपयांना मिळत होता. मुंबईत किंमत सुमारे २,०३१ रुपये, कोलकात्यात २,२०८ रुपये, तर चेन्नईत २,२४६.५० रुपये इतकी झाली आहे.
दरम्यान, घरगुती ग्राहकांसाठी मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे. १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत हा सिलिंडर सध्या सुमारे ९१३ रुपयांना उपलब्ध असून, तीच किंमत कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, यापूर्वी ७ मार्च रोजी घरगुती सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती. ही दरवाढ एका महिन्यातील दुसरी मोठी वाढ ठरली आहे. यापूर्वी १ मार्च रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ११४.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे सतत वाढणाऱ्या दरांमुळे व्यावसायिक क्षेत्रावर आर्थिक ताण वाढत आहे.
तज्ज्ञांच्या मते, पश्चिम आशियातील तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्याचाच परिणाम एलपीजी दरांवर होत आहे. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील दर आणि डॉलरच्या तुलनेतील रुपयाच्या स्थितीनुसार दर निश्चित करतात. या दरवाढीचा परिणाम आता सर्वसामान्यांवरही होण्याची शक्यता आहे. हॉटेल व केटरिंग व्यवसायाचा खर्च वाढल्याने बाहेरच्या जेवणाचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे, घरगुती दर स्थिर ठेवल्यामुळे गृहिणींना काहीसा दिलासा मिळाला आहे.

























































