Home ◼️ संपादकीय विदर्भाचे आधारवड हरपले ; दत्ताजी मेघे यांचे निधन! चार दशकांची सार्वजनिक सेवा...

विदर्भाचे आधारवड हरपले ; दत्ताजी मेघे यांचे निधन! चार दशकांची सार्वजनिक सेवा संपुष्टात ; शिक्षण, आरोग्य आणि राजकारण क्षेत्रात भरीव योगदान

वर्धा : विदर्भातील ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता राघाबोजी मेघे यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तब्बल चार दशकांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय राहून मेघे यांनी राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. साध्या, मृदू आणि संयमी स्वभावामुळे त्यांनी जनतेच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. गरीब परिस्थितीतून पुढे येत त्यांनी स्वतःची वाट तयार केली आणि हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.

त्यांच्या पुढाकारातून उभ्या राहिलेल्या शैक्षणिक संस्था आणि आरोग्य सेवा उपक्रमांमुळे विदर्भातील ग्रामीण भागाला मोठा आधार मिळाला. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी घडवले आणि त्यांना नेतृत्वाची संधी दिली. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व केवळ राजकीय नेत्यापुरते मर्यादित न राहता एक मार्गदर्शक म्हणूनही ओळखले जात होते. दत्ता मेघे यांच्या निधनाची बातमी समोर येताच विदर्भभर शोककळा पसरली. विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.

एक युग संपलं…

गरीब कुटुंबातून पुढे येत स्वतःची ओळख निर्माण करणारे दत्ता मेघे हे विदर्भाच्या मातीतील खरे नेते होते. त्यांच्या कार्यामुळे हजारो कुटुंबांचे जीवन बदलले. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेली व्यवस्था आजही समाजाला दिशा देत आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एक नेता नाही, तर एक विचार, एक मार्गदर्शक हरपला आहे.

प्रतिक्रिया…

दत्ता मेघे यांचे निधन ही विदर्भासाठी मोठी हानी आहे. त्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उभारलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.

प्रा. डॉ. पुरुषोत्तम खोब्रागडे, पवनार

दत्ता मेघे साहेब हे पवनारचे सुपुत्र होते. त्यांच्या जन्मापासूनच गावाशी त्यांचे नाते अतूट होते आणि पवनारवर त्यांचे विशेष प्रेम होते. गावाच्या विकासासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांच्या जाण्याने पवनारने आपला जिव्हाळ्याचा माणूस गमावला आहे.

माजी सरपंच, अजय गांडोळे पवनार

मेघे साहेबांनी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना मोठं केलं. अनेकांना आपल्या संस्थेत रोजगाराची संधी निर्माण करून दिली. अनेक गरजू मुलांच्या शिक्षणासाठी मेघे साहेबांनी उभारलेल्या संस्थांमुळेच आधार मिळाला. त्यांच्या जाण्याने मन सुन्न झालं आहे.

जयंत गोमासे, सामाजिक कार्यकर्ता पवनार

मेघे साहेब आमच्यासाठी फक्त नेते नव्हते, ते घरातील मोठ्या माणसासारखे होते. ते आमचं प्रेरणास्थान होते. पवनारवर त्यांचं अपार प्रेम होतं, ते प्रत्येक वेळी गावासाठी काहीतरी करण्याचा विचार करत. आज गावाने आपला जिव्हाळ्याचा आधार गमावला आहे.

नितीन कवाडे, सामाजिक कार्यकर्ता पवनार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!