


वर्धा : सावंगी परिसरात पुन्हा एकदा भरधाव वाहनांचा कहर समोर आला आहे. आज बुधवार, २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी अंदाजे पाच वाजताच्या सुमारास मारुती मंदिराजवळ भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून मागे बसलेला आणखी एक जण देखील जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावंगी कडून भरधाव वेगात येणारी कार (क्र. MH-31-EK-5264) मारुती मंदिराजवळ पोहोचताच समोरून येणाऱ्या दुचाकीवर (क्र. MH-32-AF-6775) जोरात आदळली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की दुचाकीस्वार रस्त्यावर दूर फेकला गेला. या अपघातात दुचाकीचालकाच्या शरीरावर गंभीर दुखापत झाली.
अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना सांभाळून लगेच रुग्णवाहिकेला कळविले. मात्र जखमी गंभीर असल्याचे पाहता, तेवढ्या वेळेतच एका ऑटोचालकाने माणुसकी दाखवत स्वतःचे वाहन थांबवून जखमींना त्यात बसविले आणि सावंगी येथील रुग्णालयात दाखल केले. नागरिकांच्या या तत्परतेमुळे जखमींचा जीव वाचण्याची शक्यता वाढली आहे.
धडकेनंतर दोन्ही वाहनांचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. कारचा दर्शनी भाग मोडला तर दुचाकी अक्षरशः चेंगराचेंगरीसारखी झाली. अपघातामुळे काही वेळ रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वृत्त लिहीपर्यंत जखमींची नावे स्पष्ट होऊ शकलेली नाहीत. मात्र दुचाकीचालक गंभीर असून त्याच्यासोबत असलेलाही प्रवासी जखमी झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते. पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.
बेफाम वेग!
या मार्गावरून जाणारी बरीचशी वाहने वेगमर्यादेचे पालन करत नाहीत. त्यामुळे लहान अंतरावरदेखील भीषण अपघात घडतात. रस्त्यालगत गाव असल्याने अचानक समोरून वाहन येण्याचा धोका कायम असतो. वेगावर नियंत्रण न ठेवल्यानेच अशा घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वारंवार घडतात अपघात…
सावंगी परिसरातील मारुती मंदिराजवळ गेल्या काही महिन्यांत लहान-मोठे अपघात वारंवार घडले आहेत. स्थानिक नागरिकांनी येथे स्पीडब्रेकर, वाहतूक नियंत्रण व्यवस्था आणि पोलिस गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. मात्र प्रशासनाकडून ठोस उपाययोजना अद्याप झालेल्या नाहीत.