


वर्धा : वर्धा जिल्हा कृषी विभाग कर्मचारी वृंद सहकारी पत संस्थेची ४८ वी वार्षिक आमसभा दाते सभागृहात उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाली. सभासदांच्या मोठ्या उपस्थितीत झालेल्या या आमसभेत संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. सभागृह सभासदांनी फुलून गेले होते.
आमसभेला प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते माता लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाला. यानंतर विविध सन्मान कार्यक्रम पार पडले. यामध्ये संस्थेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार, सेवानिवृत्त सभासदांचा गौरव तसेच ज्येष्ठ सभासदांचा सन्मान करण्यात आला. या सत्कारामुळे सभागृहात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अध्यक्षीय भाषणातून संस्थेच्या मागील वर्षातील कामकाजाचा तपशील सभागृहासमोर ठेवण्यात आला. संस्थेची आर्थिक स्थिती, कर्जवाटप, सभासदांना दिल्या जाणाऱ्या सुविधा यांची माहिती देण्यात आली. सचिवांनी संस्थेचा ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रक सादर केले. आर्थिक व्यवस्थापनातील पारदर्शकता अधोरेखित झाली.
सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. सभासदांनी मांडलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली. काही नवीन सूचना व मागण्या सभेत समोर आल्या असून त्यावरही विचारविनिमय करण्यात आला. सभासदांचा उत्स्फूर्त सहभाग यावेळी पाहायला मिळाला. आमसभेत उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या प्रगतीचे कौतुक करत आगामी काळात संस्थेने आणखी सेवा विस्तार साधावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. सभेच्या अखेरीस आभारप्रदर्शन करण्यात आले. संचालक मंडळासह सर्व सभासदांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आमसभेची सांगता झाली.
या आमसभे ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमाकांत कांबळे, उपविभागीय कृषी अधिकारी (हिंगणघाट) स्वप्नील तोरणे, उपविभागीय कृषी अधिकारी वर्धा वैष्णवी शिंदे, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी प्रमोद पेटकर, तालुका कृषी अधिकारी समुद्रपूर धनविजे, कृषी विभाग कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत भोयर, सचिव मोईन शेख, कोषाध्यक्ष विजय खोडे, उपाध्यक्ष अविनाश भागवत, सहसचिव ललिता राठोड, संचालक सुभाष राठोड, गणेश पिवळात्कार, विनेश थोरात, सुचिता रायपुरे, जयश्री धांडे, सचिन जाधव, जितेंद्र रामटेके, रेश्मा बोरले, सुचिता सयाम, माजी अध्यक्ष भास्कर मोघे, ज्येष्ठ पदाधिकारी विलास मेघे, अनंत तिमांडे यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.