


पवनार : पवनार गावालगतच्या निसर्गरम्य टेकडीवर वसलेल्या प्राचीन नागटेकडी मंदिरात नागपंचमीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. गावातील आणि परिसरातील शेकडो भाविकांनी या पुरातन धार्मिक स्थळाला भेट देत नागदेवतेची पूजा अर्चा केली. पवनार, सुरगाव, कान्हापूर, गोंदापूर, सेलू, नालवाडी, वर्धा येथून आलेल्या भाविकांनी “ॐ नमः नागाय” चा गजर करत नागदेवतेला नारळ, फुलं आणि दूध अर्पण केले.
पवनारपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेली नागटेकडी, ही एक उंचवट्यावर वसलेली हिरवाईने नटलेली टेकडी असून येथील नागदेवतेचे मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिरास पावसाळ्यात विशेषतः नागपंचमीच्या दिवशी मोठा धार्मिक महिमा आहे. पूर्वीपासून गावकऱ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरलेल्या या स्थळी नागदेवतेची विधिवत पूजा केली जाते. नागपंचमीला पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची रांग लागली होती. हातात नारळ, दूध, अगरबत्ती, फुलांचे त्रिशूळ आणि प्रसाद घेऊन आलेल्या भाविकांनी मंत्रोच्चारात पूजा केली. काही भाविकांनी होमहवन देखील केले. परिसरातील महिलांनी पारंपरिक पोशाखात नागदेवतेसाठी झाडांभोवती पाणी अर्पण करत बेलवृक्ष आणि नागदेवतेस वंदन केले.
ढगाळ हवामान, टेकडीवरून वाहणाऱ्या मंद वाऱ्याच्या झुळुका, आणि आकाशातून हलकासा शिडकाव करणारा पाऊस यामुळे नागपंचमीचा अनुभव आध्यात्मिकतेने भारलेला होता. परिसरातील निसर्ग, साखरझोपेतून जागा झाल्यासारखा वाटत होता. मंदिराभोवती गजबजाट असतानाही श्रद्धेचा शांत भास होत होता. पिढ्यानपिढ्या लोकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेली ही नागटेकडी आजही गावकऱ्यांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. नागदेवतेस नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी नागपंचमीला अखंड भाविक येतात. वयोवृद्ध आजीबाईंच्या आठवणीतून, आईच्या ओंजळीतून आणि लहानग्यांच्या कुतूहलातून ही परंपरा पुन्हा पुन्हा जागी होते. ही फक्त एक टेकडी नाही, तर गावच्या श्रद्धेचं, नात्यांचं, आणि देवाशी असलेल्या आत्मिक नात्याचं गाठोडं आहे.