

वर्धा : पुरोगामी विचारधारेचे अभ्यासू कार्यकर्ते तसेच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शिवधर्म फाऊंडेशन या सनातनी प्रवृत्तीच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून शाई फेक व धक्काबुक्की करण्यात आल्याच्या घटनेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महाराष्ट्र अंनिस) वर्धा जिल्हा व शहर शाखा, तसेच सर्व पुरोगामी संस्था संघटना समन्वय समिती वर्धा जिल्हा यांच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.
या प्रकरणी तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी वर्धा यांच्या मार्फत निवेदन देत केली आहे. महाराष्ट्र अंनिसच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, सामाजिक परिवर्तनासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतील सूत्रधार अजूनही मोकाट असल्यानेच अशा प्रवृत्तींना कायद्याचे भय राहिलेले नाही. त्यामुळेच प्रवीण गायकवाड यांच्यासारख्या पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांवर उघडपणे हल्ले करण्याचा त्यांचा धाडसी प्रकार वाढीस लागला आहे.
हल्लेखोरांनी दिलेले कारण अत्यंत फोल व तकलादू असून, कायद्याच्या राज्यात कोणत्याही कारणास्तव असा हल्ला करणे निषेधार्हच असल्याचे अंनिसने नमूद केले. विशेष म्हणजे, जनसुरक्षा विधेयक विधिमंडळात मंजूर होऊन अवघे काही दिवस लोटले नसताना झालेला हा हल्ला, म्हणजे अशा सनातनी प्रवृत्ती या नव्या कायद्यालाही जुमानत नसल्याचा स्पष्ट संदेश देतो, अशी टीकाही या वेळी करण्यात आली. महाराष्ट्र हा संत व सुधारकांचा प्रदेश असून अशा घटना महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला काळिमा फासणाऱ्या असल्याचे मत मांडण्यात आले. या हल्ल्यामागील मूळ सूत्रधारांचा शोध घेऊन कोणताही पक्षपात न करता कठोर कारवाई करून “कायद्यासमोर सर्व समान आहेत” हे दाखवून द्यावे, अशी ठाम मागणी महाराष्ट्र अंनिसच्या वतीने करण्यात आली.
हे निवेदन देण्यासाठी सत्यशोधक समाजाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक चोपडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, राज्य पदाधिकारी प्रकाश कांबळे, महिला विभागाच्या कार्यवाह द्वारकाताई ईमडवार, किसान सभेच्या अनुराधा उटाणे, युवा सोशल फोरमचे अध्यक्ष सुधीर पांगुळ, कैलास जुनारकर, अलीम शेख व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.