

गिरड : येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रीय शाळेतील विद्यार्थ्यांनी मंगळवारी (दि. ८ जुलै) शाळेतच देशी बियाणे बँक उभारण्याचा संकल्प केला. मगन संग्रहालय समितीच्या नैसर्गिक शेती विकास केंद्राच्या वतीने सुरू असलेल्या बीज दान अभियानात शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या वेळी शाळेच्या परिसरात पोषण वाटिका तयार करण्यासाठीही पुढाकार घेण्यात आला.
या कार्यक्रमात केंद्रीय शाळेतील सुमारे १२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी स्वतः संकलित केलेल्या देशी बियाण्यांचे पाहुण्यांच्या हस्ते पूजन करून घेतले. त्यानंतर बियाण्यांचे छोटे प्रदर्शन मांडून त्यांची माहिती उपस्थितांना दिली. बीज दान अभियानात संकलित बियाणे विद्यार्थ्यांनी औपचारिकरित्या दान केले.
या कार्यक्रमास नैसर्गिक शेती विकास केंद्राचे प्रमुख गजानन गारघाटे, कार्यक्रम संयोजक विष्णू ब्राम्हणवाडे, सचिन उरकुडे, मुख्याध्यापक नारायण आडकीने, शिक्षक एम. आर. धनविजय, एस.व्ही. मरसकोल्हे, पी.डी. साबरे, उषा गुडघे, एस.यु. गजभिये, डी.पी. पिसरवार यांची उपस्थिती होती.
यावेळी शाळेतील शिक्षकांनी मागील वर्षी शाळा परिसरात तयार केलेल्या पोषण वाटिकेचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर कथन केला. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना नैसर्गिक बियाण्यांचे जतन, देशी बियाण्यांची महत्त्व, तसेच पोषण वाटिकेची उपयुक्तता समजावून सांगितली.
बीज दान अभियान हे १२ जुलैपर्यंत राबवले जाणार असून परिसरातील १३ शाळांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. तसेच शेतकरी व महिलांनीही यात सक्रिय सहभाग घेत, नैसर्गिक शेतीकडे वळण्याची तयारी दाखवली आहे. निसर्ग घटकांची आणि शेतीच्या विषयांची आवड बालवयात निर्माण होणे काळाची गरज आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीचे विचार रुजतात, कृतिशीलतेतून कार्य करण्याची सवय लागते. हा अनुभव विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनासाठी मोलाचा आहे, असे मुख्याध्यापक नारायण आडकीने यांनी सांगितले. कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सामूहिक गीताने करण्यात आला.