

अल्लीपूर : वर्धा नदीच्या काठावर कापसी गावालगत सुरू असलेल्या अवैध रेती उपशयावर अल्लीपूर पोलिसांनी मंगळवारी (२८ मे) पहाटे कारवाई करत पाच ट्रॅक्टर, पाच ट्रॉली आणि रेती असा सुमारे ३० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक आणि मालक अशा एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई गुप्त माहितीनंतर करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा क्रमांक २८७/२०२५ अन्वये संबंधितांवर कलम ३०३(२), ६२, ३(५) BNS तसेच कलम ३(१), १८१, १३०, १७७ मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या कारवाईसाठी मा. पोलीस अधीक्षक वर्धा, अप्पर पोलीस अधीक्षक व सहाय्यक पोलीस अधीक्षक पुलगाव यांचे निर्देश लाभले. सपोनि प्रफुल डाहुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा अतुल लभाने, अजय रिठे, राहुल नव्हाटे, अनुप नाईक, रवि वर्मा, पो.अं. योगेश चंदनखेडे आणि तुषार भोंबे यांच्या पथकाने ही कारवाई केली. वर्धा नदीकाठी सुरू असलेल्या अवैध रेती उपशयामुळे शासनाचे कोट्यवधींचे महसुली नुकसान होत असल्याने स्थानिक नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. अशा पार्श्वभूमीवर ही कारवाई होत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.