
हिंगणघाट : वृद्ध महिला बसमधून उतरली, बॅगमधून पैसे काढण्याच्या गडबडीत होती आणि… ‘ती’ आली! काही कळायच्या आत तिची बॅग साफ! पण या ‘चोरीच्या खेळी’चा शेवट मात्र थेट पोलिसांच्या जाळ्यात झाला. बुटटीबोरी येथील ६५ वर्षीय वच्छला गोपालराव बोरधरे या महिला वाढदिवसाच्या निमित्ताने हिंगणघाट येथे आल्या होत्या. १४ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता नंदोरी चौकात बसमधून उतरताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलेने त्यांच्या बॅगेतील ३ तोळ्यांची पोत, ३ तोळ्यांचा पोहेहार व ५ हजारांची रोकड असा एकूण ४.२५ लाखांचा ऐवज चोरून नेला.
फिर्याद दाखल होताच हिंगणघाट पोलिसांनी शोधमोहीम उघडली. पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर व उपविभागीय अधिकारी रोशन पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथक सक्रिय झाले. नंदोरी चौकात एका महिलेची हालचाल संशयास्पद वाटल्याने महिला पोलीस अंमलदार सुषमा कावळे यांच्या मदतीने तिला ताब्यात घेण्यात आले. पोलीस ठाण्याच्या या ‘स्मार्ट’ कारवाईमुळे आरोपीच्या हातातील सगळी सोन्याची ‘खेळी’ अखेर मोडीत निघाली. या कामगिरीत पोउपनि भारत वर्मा, पो.ह. प्रशांत ठोबरे, यशवंत गोल्हर, विनोद बुरीले, राहुल साठे, राकेश आष्टनकर, विकास अवचट, नरेंद्र आरकेर, विशाल बंगाले, आशिष नेवारे, मंगेश वाघमारे आणि महिला पो. अं. सुषमा कावळे यांचे मोलाचे योगदान राहिले.



























































