

वर्धा : वन गुन्हा दाखल करण्याचा धाक दाखवीत जेसीबी मालकाकडून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना कारंजा (घाडगे) येथील वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गायनेर यांना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई वनपरिक्षेत्र कार्यालयातच वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
मिळालेल्या माहितीनुसार कारंजा (घाडगे) वनपरिक्षेत्रात एका जेसीबी मशीनने नुकसान केले म्हणून जेसीबी मालकावर वन अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाईचा निपटारा करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गायनेर यांनी दहा हजार रुपयांची मागणी केली होती. आज कार्यालयातच जेसीबी मशीन मालकाकडून चलनाचे दंड २ हजार रुपये आणि स्वतःच्या आर्थिक लाभासाठी १ हजार रुपये अशी एकूण तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलिस अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक डी. सी. खंडेराव व पोलिस निरीक्षक संदीप थडवे, रवींद्र बावनेर, संतोष बावनकुळे, कैलास वालदे, नीलेश महाजन, प्रीतम इंगळे व प्रशांत मानमोडे यांनी केली. कुणीही लाच मागत. असल्यास संपर्क साधन्याचे आवाहनही केले आहे.