

वायगाव (नि.) : उभ्या ट्रकवर भरधाव कार आदळली. यात पेट्रोलपंप व्यावसायिक गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी रात्रीच्या सुमारास वर्धा – वायगाव (नि). मार्गावरील सेलूकाटे शिवारात झाला. रामदास वानखेडे (४६) रा. वायगाव (नि) असे जखमीचे नाव आहे. ते हिशेबानंतर कारने परतीचा प्रवास करीत होते.
रामदास वानखेडे हे नेहमीप्रमाणे त्यांच्या मालकीच्या पेट्रोलपंपावर गेले. त्यांनी पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांकडून पेट्रोल विक्रीचा हिशेब घेतला. त्यानंतर ते एम. एच. ३२ वाय. १७२२ क्रमांकाच्या कारने वर्धेच्या दिशेने जात होते. भरधाव कार सेलूकाटे शिवारात आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच वाहन रस्त्याच्या कडेला धोकादायक पद्धतीने उभ्या असलेल्या एम, एच. ३४ बी. जी. ३८८६ क्रमांकाच्या नादुरुस्त ट्रकवर धडकली. यात रामदास वानखेडे हे गंभीर जखमी झाले. जखमीला परिसरातील नागरिकांच्या मदतीने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद सावंगी पोलिसांनी घेतली आहे.