

वर्धा : येथील महात्मा गांधी आंतराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाच्या वसतिगृहातील दहा विद्यार्थ्याची प्रकृती अळ्यायुक्त जेवणामुळे खालावल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्यवस्थापनाकडे वारंवार तक्रार करूनही चांगले जेवण देण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत हिंदी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत घोषणाबाजी केली.
शनिवारी रात्रीच्या जेवणानंतर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक खालवली व त्यांना उलट्या होऊ लागल्याने तब्बल दहा विद्यार्थ्यांना तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. अळ्यायुक्त जेवणामूळेच हा प्रकार घडल्याचा आरोप करत २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येत रात्री २ वाजेपर्यंत आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला. शिवाय जेवण पुरवठ्याचे कंत्राट असलेल्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. येत्या ७२ तासांत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला.