

वर्धा : शेतात खोदलेल्या तलीवात पाय घसरून पडल्याने 12 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना लगतच्या सालोड (हिरापूर) येथील नवीन आरटीओ मैदानालगत असलेल्या शेतातील तलावात रविवारी 24 जुलैला सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. शैलेश संतोष तेलंग रा. सालोड (हिरपूर) असे मृत मुलाचे नाव आहे.
नवीन आरटीओ मैदानाजवळ 15 ते 20 फूट खोल खड्डे पडले आहेत पावसाचे पाणी त्यात भरल्याने शेताला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले. या तलावात पोहण्यासाठी गावातील काही मुले रविवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास गेली होती. शैलेशही त्यांच्यासोबत गेला होता. दरम्यान तलावाच्या शेजारी उभ्या असलेल्या शैलेशचा पाय घसरल्याने तो तलावात पडला. त्याला पोहणे येत नसल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला शैलेश बुडताना पाहून पोहण्यासाठी गेलेल्या मुलांनी पळ काढत घर गाठून घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी सावंगी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.