

वर्धा : जुन्या वादाचा वचपा काढत युवकाला लाथाबुक्क्यांनी, तसेच चाकूने वार करीत गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना २६ रोजी निशानपुरा वॉर्ड हिंगणघाट येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. विहार ऊर्फ बिट रविकिरण मून (२४) रा. वीर भगतसिंग वॉर्ड असे जखमीचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर पोलिसांनी अटक केलेल्यांत भोजराज तुकाराम जंगले, अज्जू ऊर्फ मोहन प्रकाश भुसारी, रोहित प्रकाश गोदे सर्व रा. हिंगणघाट या आरोपींचा समावेश आहे.
विहार मुन हा त्याच्या मित्रासोबत बसून असताना भोजराज जंगले याने जुन्या वादातून विहारच्या चेहऱ्यावर चाकू फिरविला. दरम्यान अज्जू याने मारो सालेको, असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान भोजराज याने चाकूने विहारच्या चेहऱ्यावर, कानावर, हातावर चाकूने वार करीत त्यास गंभीर जखमी केले. तसेच पोलीस ठाण्यात गेला तर जिवाने ठार मारेन, अशी धमकी दिली. झालेल्या झटापटीत विहारचा मोबाईल पडला. दरम्यान तेथे रोहिद गोदे आला आणि दोन्ही आरोपींना दुचाकीवर बसवून नेत पळ काढला. जखमी विहारचे हिंगणघाट पोलिसांनी बयाण नोंदवून गुन्हा दाखल करीत तिन्ही आरोपींना अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.