

पुलगाव : पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढत गेलेल्या किमतीमुळे पुलगावात सध्या पेट्रोल 121 रुपये 3 पैसे अर्थात 121 रुपये झाले आहे, तर डिझेलच्या भावानेही शंभरी पार केली असून. डिझेलचे भाव 103 रुपये 72 पैसे लिटर झाले आहे गेल्या आठ दिवसांत झालेली ही चौथी दरवाढ आहे. इंधनाचे दर वाढत असल्याने घरगुती गॅस सिलिंडर, डाळी, तेल, पालेभाज्यांचे भावही वाढू लागले आहेत. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्याने वाहतूक खर्च वाढला व त्यामुळे वस्तूंचे भाव वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. इंधनाच्या दरासह जीवनावश्यक वस्तूंचे भावही वाढत चालले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी आर्थिक अडचण झाली आहे.
दररोजची कमाई व त्यातून घरखर्च करावा लागतो धावपळीच्या या जगात वाहनाचा वापरही करावा लागत आहे व त्यातच सतत भाववाढ होत असल्याने त्याचाही अतिरिक्त ताण सामान्य नागरिकांच्या खिशाववर पडत आहे. त्यामुळे जीवन जगणेही कठीण झाले आहे. पंधरा दिवसांतच पेट्रोलच्या भावात 9 रुपये 20 पैशाने वाढ झाली आहे. बहुतांश शहरामध्ये पेट्रोलचे भाव 121 रुपये लिटरबर गेले आहेत. इंधनाच्या वाढलेल्या भावामुळे वाहनांचा वाहतूक खर्चही वाढला आहे. त्याचा परिणाम वस्तूंच्या किंमत वाढीवर होत आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे भावही आता हजार रुपये झाले आहेत.