

हिंगणघाट : प्राध्यापिका अंकिता जळीतकांड प्रकरणात शुक्रवारी सरकारी आणि आरोपी पक्षातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला. या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल येत्या 5 फेब्रुवारीला येणार असल्याची माहिती प्रसिद्ध विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. शुक्रवार 21 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश भागवत यांच्यासमोर सरकारी पक्ष आणि बचाव पक्षातर्फे युक्तिवाद सुरू झाला. 2 वाजता न्यायालयीन कामकाज पूर्ण झाले.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे 29 साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे न्यायालय या प्रकरणाचा निकाल देईल, असा विश्वास उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणाचे कामकाज संपल्यानंतर पत्रकारांसोबत बोलतांना व्यक्त केला. प्राध्यापिका अंकिता हिची 2 फेब्रुवारी 2020 ला निर्घृण हत्या करण्यात आली होती. 10 फेब्रुवारी 20 ला तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद देशात उमटले होते. अंकिता जळीतकांड प्रकरणात पोलिसांनी आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्यावर भारतीय दंड विधानानुसार आरोप निश्चित केले होते.
या प्रकरणाचे न्यायालयीन कामकाज सुमारे दोन वर्षं चालले. कोविड काळातही न्यायालयीन काम सुरु ठेवण्यात आलेले होते. सरकारी पक्षातर्फे एडवोकेट उज्वल निकम आणि एडवोकेट दीपक वैद्य’ यांनी भाग घेतला तर बचाव पक्षातर्फे ‘एडवोकेट भूपेंद्र सोने, आड शुभांगी कोसारे, अवंती सोने आणि सुदीप मेश्राम यांनी सहकार्य केले. या प्रकरणात येत्या पाच तारखेला निकाल येणार असून या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.