

केळझर : ट्रान्स्फॉर्मरवर अतिरिक्त विजेचा दाब येत असल्याने शेतातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे केळझर, सेलडोह, खडकी, आमगाव व वडगाव (जंगली) या परिसरात असलेल्या शेतातील ओलित प्रभावित झाले आहे. शेतातील वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, या मागणीसाठी पाचही गावांतील शेतकऱ्यांनी केळझर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धडक देत मागण्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता मनोज खोडे यांना दिले.
रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांची गहू व हरभऱ्याच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे. शेत पेरणीसाठी तयार करण्यासाठी ओलित करण्याचे काम सुरू आहे. शेतीला आठ तास वीज पुरवठा केला जातो. यात आठवड्यातून तीन दिवस दिवस, तर इतर दिवस रात्री वीज पुरवठा सुरू असतो. या वेळापत्रकानुसार शेतकरी दिवसा व रात्रीच्या थंडीत ओलित करण्यास गेला असला तरी वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेत पूर्णपणे ओलित होत नाही. परिणामी, पेरण्या उशिराने होत आहे. याचा परिणाम उत्पन्नावर होण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तविल्या जात आहे.
मागील पंधरा ते वीस दिवसांपासून असा प्रकार सुरू असल्याने शेतकऱ्यांना वेळापत्रकानुसार अखंडित वीज पुरवठा करावा, आठवड्यातून चार दिवस दिवसपाळीत वीज पुरवठा करावा, आठ तासांऐवजी बारा तास वीज द्यावी, केळझर वीज वितरण केंद्रातून दहेगाव वीज वितरण केंद्र वेगळे करावे, वीज जोडणीसाठी डिमांड भरण्याची व्यवस्था केळझर येथे करावी, भौगोलिक क्षेत्राचा विचार करून नवीन सेक्शन ऑफिस केळझर किंवा दहेगावला देण्यात यावे, तसेच केळझरला नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावे, आदी मागण्या केल्या.
यावेळी अभियंता मनोज खोडे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. चर्चेदरम्यान केळझरचे कनिष्ट अभियंता धम्मदीप जीवतीडे, जि. प. सदस्य विनोद लाखे, लक्ष्मीकांत वन्हाळकर, अनिल तेलरांधे, युसूफ शेख, ईर्शाद शेख, गणेश खंडाळे, विजय कोथळे, सुदाम पवार, शकील खोडे, आदींसह शेतकरी उपस्थित होते.