

वर्धा : क्रेडिट कार्डची माहिती विचारून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपींना दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वर्धा पोलिसांच्या सायबर सेल मधील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी केली असून दिवाळीच्या तोंडावर पोलिसांकडून करण्यात आलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे.
विवेकप्रसाद शहा (२१), आकाश गणेश मंडल (२१) व रॉबिन श्याम करोटीया (२१) सर्व रा. दिल्ली, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुप्रिया झाडे यांना फसवणूक करणाऱ्यांनी फोन करून मी बँकेतून बोलत आहे, तुमचे क्रेडिट कार्ड बंद होणार आहे, ते सुरू ठेवायचे असल्यास कार्ड नंबर सांगा व ओटीपी सांगा असे सांगितले.
सुप्रिया यांनी फोन करणाऱ्यावर विश्वास ठेवून सदर माहिती दिली. याच माहितीचा वापर करून आरोपींनी सुप्रिया यांच्या बँक खात्यातून ९९ हजार २७५ रूपये परस्पर काढून त्यांची आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुप्रिया यांनी हिंगणघाट पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत तपासाला गती दिली. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी सायबर सेलच्या पोलिसांचीही मदत घेण्यात आली.
फसवणूक करणारे दिल्ली येथील असल्याची खात्रीदायक माहिती मिळताच वर्धा पोलिसांचे पथक दिल्ली रवाना झाले. पोलिसांनीही पाच दिवस दिल्लीत राहून मोठ्या शिताफीने या तिन्ही ठगबाजांना ताब्यात घेतले. या ठगबाजांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून पोलिसांच्या त्यांच्याकडून तीन मोबाईल, दोन डेबिट कार्ड, बँकेचे पासबुक जप्त केले आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, सोमनाथ टापरे, निलेश कट्टोजवार, अनूप कावळे, स्मिता महाजन, निलेश तेलरांधे, आकाश कांबळे यांनी केली.