दुकानातील नोकराने केला ६.६४ लाखांचा अपहार! ४७ जणांकडून केली पैशांची उचल

वर्धा : दुकानातील नोकराने मालकाने दिलेल्या उधारीचे ५ लाख ४५ हजार ४२४ रुपये परस्पर वसूल करून तसेच दुकानातील दुचाकी आणि ट्रकचे टायर व गल्ल्यातील रोख अशा एकूण ६ लाख ६४ हजार ४२५ रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले. दुकानमालकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी याबाबतची तक्रार शहर पोलिसात दिली आहे.

वंजारी चौक परिसरात दिलीपसिंह उजागरसिंह ठाकूर यांच्या मालकीचे टायर विक्रीचे पूनम ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. त्यांनी दुकानात आंजी येथील सय्यद रशीद ऊर्फ रियास मजर अली नामक नोकराला कामावर ठेवले होते. मागीलवर्षी कोरोना असल्याने दुकान बंद होते. त्यामुळे उधारीने दिलेल्या मालाचे पैसे मिळाले नाहीत. २०२१ जुलै महिन्यात दिलीपसिंह ठाकूर यांनी उधारीने माल घेऊन गेलेल्यांना पैशांची मागणी केली असता त्यांना दुकानात काम करणाऱ्या रशीद अलीने पैसे नेल्याचे सांगितले.

१ ऑगस्ट २०२१ रोजी रशीदने दुकानातील ट्रकचे टायर रेहान पटेल याला पाठविण्यास सांगितले होते. तसेच त्याने एम.एच.३२ क्यू. ९७९२ क्रमांकाची दुचाकी वसुलीसाठी जातो म्हणून घेऊन गेला होता. तो परत आलाच नसल्याने दुकानात जात पाहणी केली असता गल्ल्यातील ४ हजार रुपये दिसून आले नाही. दिलीपसिंह ठाकूर यांनी नोकराने कोणाकडून किती पैसे घेतले याची माहिती घेतली असता त्याने तब्बल ४७ जणांकडून ६ लाख ६४ हजार ४२५ रुपये घेतल्याचे समजले. त्याने अपहार केल्याप्रकरणी दिलीपसिंह ठाकूर यांनी शहर पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here