

वर्धा : १० लाख रुपये कॅश द्या, किंवा नागपूर येथे फ्लॅट घेऊन द्या, अशी मागणी करून भावी पतीने साखरपुडा झाल्यावर लग्नास नकार दिल्याने शहर पोलीस ठाण्यात हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिपरी मेघे परिसरातील युवतीचा विवाह नागपूर येथील दिनेश शंकर जसारी याच्याशी पक्का झाला होता. दरम्यान, दोघांचाही साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. मात्र, काही दिवसांनी दिनेशने युवतीच्या मोबाईलवर मेसेज करून मला दहा लाख रुपये द्या किंवा नागपूर येथे फ्लॅट विकत घेऊन द्या, अशी मागणी केली.
जर माझ्या नावाने फ्लॅट घेऊन देत असाल तरच मी लग्न करण्यास तयार आहे, अन्यथा मी लग्न करीत नाही, असे दिनेशने म्हटले असता दोन्ही परिवारात बैठका झाल्या, तरीही दिनेशने लग्नास नकार देत युवतीच्या कुटुंबीयाची फसवणूक केल्याने युवतीच्या भावाने याबाबतची तक्रार शहर पोलिसात दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.