व्यक्तीचा नव्हे, तर कार्यकर्तृत्वाचा सत्कार! खासदार रामदास तडस : श्रमिक पत्रकार संघाचे आयोजन

वर्धा : कोरोना महामारीच्या काळात पत्रकारांनी जीव धोक्यात घालून कोरोना योद्धा म्हणून भूमिका बजावताना लोकांमध्ये जनजागृती केली. आज सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार झाला. हा व्यक्तींचा नव्हे तर त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा सत्कार होय, असे गौरवोदगार खासदार रामदास तडस यांनी वर्धा श्रमिक पत्रकार संघातर्फे मराठी पत्रकार दिनीनिमित्त आयोजित चौथा स्तंभ पुरस्कार वितरण सोहळ्यात काढले.

कार्यक्रमाला दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे विशेष कार्य अधिकारी डाँ. अभ्युदय मेघे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, समाजसेवी सुनील बुरांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डाँ. अभ्युदय मेघे यांनी पत्रकारितेच्या इतिहासाची थोडक्यात वाटचाल सांगताना आजही माहिती मिळविण्याचे आणि अन्याय दाद मागण्याचे माध्यम म्हणून प्रसारमाध्यमांची भूमिका अतिशय मोलाची असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी मंगेश वरकड यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यकर्तृत्वाचा पुरस्कारांनी सन्मान

आसमंत स्नेहालय या संस्थेच्या माध्यमातून निराधार, निराश्रित मुला-मुलींना व ज्येष्ठांना आश्रय देऊन त्यांचे संगोपन, शिक्षण, आरोग्य आणि सर्व जबाबादारी स्वीकारणा-या शिवाजी चौधरी यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि 5 हजार रोख पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र सुरकार, ज्येष्ठ पत्रकार शेख सत्तार, वरिष्ठ पत्रकार प्रा. डाँ. राजेंद्र मुंढे आणि वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी नरेंद्र मते यांचा चौथा स्तंभ पत्रकारिता पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या तिन्ही पुरस्कारांचे स्वरुप प्रत्येकी अडीच हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ असे होते.

यावेळी सत्कारमूर्ती शिवाजी चौधरी आणि नरेंद्र सुरकार यांनी आपल्या कार्याची माहिती देताना या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डाँ. प्रवीण वानखेडे, प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे यांनी केले. प्रवीण होणाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार मंडळी आणि नागरिकांची उपस्थिती होती. आयोजनाकरिता वर्धा श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सदस्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here