
वर्धा : विवाह सोहळ्यात निष्काळजीपणे फटाक्यांची आतषबाजी करत असताना रस्त्याने जाणाऱ्या एका मुलाच्या डोळ्याला गंभीर इजा झाल्याने डोळा निकामी झाला. तर, दुसऱ्या मुलाच्या हातावर फटाक्यांची ठिणगी उडाल्याने तो जखमी झाला. ही घटना श्रीहरी कॉलनी परिसरात घडली असून, याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मोहम्मद मुशहीद रजा शेख शरीफ आणि विराज आडे अशी जखमी झालेल्या मुलांची नावे असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शेख शरीफ अब्दुल नबी यांनी पोलिसात याविषयीची तक्रार दिली आहे. प्राप्त माहितीनुसार, शेख शरीफ अब्दुल नबी हे दुचाकीने अमरावती गेले असताना अज्ञाताने त्यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क करुन मुलगा जखमी झाल्याची माहिती दिली.
मोहम्मद मुजहिद रजा शेख शरीफ हा रस्त्याने जात असताना अज्ञाताने फटाके फोडल्याने त्याच्या डोळ्याला गंभीर जखम झाली. तो जोरजोराने ओरडत होता. त्याला विचारले असता, मोहम्मद हा मित्र आदित्य रंगारी आणि इतर मित्रांसह रस्त्याने जात असताना देवल सुरेश सरोदे याचे लग्न असल्याने काही युवक रस्त्यावर फटाके फोडत होते. मोहम्मद आणि त्याचे मित्र रस्त्याकडेला थांबून असतानाच एका फटाक्याची ठिणगी उडून मोहम्मदच्या डोळ्याला लागली. यात मोहम्मदच्या डोळ्याला गंभीर जखम झाली तसेच विराज प्रफुल्ल आडे यालाही फटाके लागून तो जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मोहम्मदवर सेवाग्राम येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात नेले असता, तेथील डॉक्टरांनी त्याचा डाव्या बाजूचा डोळा निकामी झाल्याचे सांगितले. तर विराज आडे याच्यावरही उपचार सुरु आहेत. याप्रकरणी देवल सुरेश सरोदे आणि फटाके उडविणाऱ्या अज्ञातांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास आर्वी पोलीस करत आहेत.




















































