

देवळी : महिलांच्या उपस्थितीत अर्वाच्च भाषा वापरून शिवीगाळ करणाऱ्या अज्ञात व्यक्तीला मोटरसायकलस्वाराने टोकले असता त्याच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना शिरपूर येथील कापसे पेट्रोलपंपावर सोमवारी सायंकाळी उशिरा घडली. चारचाकी वाहनातून आलेल्या आरोपीचा देवळी पोलीस शोध घेत आहेत.
सोमवारी सायंकाळी शिरपूर येथील कापसे पेट्रोलपंपावर पांढऱ्या रंगाची आर्टिका कार पेट्रोल भरण्यासाठी आली. याचवेळी तक्रारकर्ता राजू रावण मोहिते (3६, रा. धानोरा, ता. चांदूर (रेल्वे) हेही. दुचाकीत इंधन भरण्यासाठी आले. पेट्रोल देण्यास विलंब होत असल्याच्या कारणावरून कारमधील एका व्यक्तीने पेट्रोलपंपावरील एका कर्मचाऱ्यास शिवीगाळ केली.
यावेळी पेट्रोलपंपावर महिलांची उपस्थिती असल्याने दुचाकीस्वाराने शिवीगाळ करणाऱ्यास हटकले असता त्यांने धारदार शस्त्राने राजू मोहिते यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. शिवाय घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेप्रकरणी देवळी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.