

वर्धा : न्यायालयात तारखेवर हजर झालेल्या पतीने पत्नीला बेकायदेशीरित्या तलाक… तलाक.., तलाक… म्हणत सोडून दिले. पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध आर्वी पोलिसात मुस्लिम महिला विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण कायदा २०१८ कलम 3, ४ अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.
शबाना परविन सय्यद जावेद काजी हिचा विवाह सय्यद जावेद काजी ऊर्फ नसरुद्दीन काजी याच्याशी २०१६ मध्ये झाला होता. लग्नानंतर पतीकडून विवाहितेला मानसिक त्रास सुरू केला, पती विवाहितेला हुंड्याची मागणी करून शारीरिक छळ करीत होता. दरम्यान विवाहितेने याबाबतची तक्रारही दिली होती. तसेच कौटुंबिक हिंसाचाराची तक्रारही आर्वी न्यायालयात दाखल केली होती, पती अनेकदा न्यायालयातील तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकून सोडचिठ्ठी घेण्यासाठी मागणी करीत होता.
आर्वी न्यायालयात पेशी असल्याने तारखेवर पती हजर असतानाच संतापलेल्या पतीने विवाहितेला बेकायदेशीररित्या तीन वेळा तलाक म्हणून, तू माझी पत्नी नाही, असे म्हणत तेथून निघून गेला. यामुळे विवाहितेवर मानसिक आघात झाल्याने तिने आर्वी पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिल्याचे पोलिसांनी सांगितले असून तपास सुरु आहे.