शेतातील गोठ्याला आगलागुन दोन गाय, तीन बैलांसह श्वानाचा मृत्यू

हिंगणघाट : तालुक्‍यातील सातेफळ नजीकच्या काजळसरा येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागली. यात दोन गाय, तीन बैल व एका श्वानाचा होरपळून मृत्यू झाला. शिवाय गोठ्यातील संपूर्ण साहित्य कोळसा झाल्याने शेतकऱ्याचे तब्बल ७ लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे. शेतकरी लक्ष्मीकांत पंढरीनाथ देवतळे यांच्याकडे ६.४३ हेक्‍टर शेती असून त्यांनी शेतीउपयोगी साहित्य व जनावरे ठेवण्यासाठी शेतात गोठा बांधला. याच गोठ्याला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. यात तीन बैल, दोन गायी, एक श्वान तसेच ६० कोंबड्यांचा होरपळून मृत्यू झाला. शिवाय गोठ्यातील दहा पोती हळद, पाच पोती सोयाबीन, दहा पोती युरिया, २० पोती कुटार तसेच शेती उपयोगी संपूर्ण साहित्य जळून खाक झाले.

या घटनेची नोंद महसूल तसेच पोलीस विभागाने घेतली असून आग नेमकी कश्यामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here