उभ्या ट्रकवर ट्रक धडकल्याने ट्रक चालक गंभीर! चिस्तुरच्या पुलाजवळील घटना

तळेगाव : नादुरुस्त ट्रक रस्त्यावर उभा असताना दुसऱ्या भरधाव ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला असून हा अपघात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील चिस्तुर पुलाजवळ झाला. अमरावतीकडून नागपूरकडे जाणारा पी.बी.४६ एम. 3८७७ क्रमांकाचा ट्रक नादुरुस्त झाल्याने रस्त्याच्या बाजूला उभा होता. यादरम्यान मागाहून येणार्‍या एन.एल.०१ एल. ८९४९ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने जबर धडक दिली. त्यामुळे या ट्रकचा चालक कक्ष क्षतिग्रस्त झाल्याने त्यात दबून चालक गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन चालकाला ट्रक बाहेर काढले. त्याला तात्काळ आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने चालकाला पुढील उपचाराकरिता तिवसा येथे हलविण्यात आले. अपघातानंतर नादुरुस्त असलेल्या ट्रकमध्ये केमिकलचा उग्र वास येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here