
वर्धा : परभणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व संविधान शिल्पाच्या विटंबनेविरोधात निघालेल्या निषेध मोर्चात अटक केलेल्यांपैकी उच्च शिक्षित भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला, या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निर्माण सोशल फोरमने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे निवेदनाद्वारे केली.
परभणी १० डिसेंबर रोजी पवार नावाच्या व्यक्तीने विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची व संविधानाची विटंबना केली. यामुळे समाजबांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्या गोष्टींचा निषेध करू लागले. दुसऱ्या दिवशी परभणी बंदचे आवाहन केले आणि निषेध नोंदवला. पोलिस प्रशासनाने त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास कोम्बिंग ऑपरेशन राबवून आंबेडकरी समाजातील लोकांना घरात घुसून बाहेर काढून अमानुषपणे महिला, पुरुष, युवकांना मारहाण केली. दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करून पोलिस कोठडीमध्ये नेले. मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला. हा मृत्यू नसून एक खून करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व मृताच्या कुटुंबाला आणि सर्व आंबेडकरी समाजाला न्याय द्यावा; अन्यथा जनआक्रोश आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी निर्माण सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष नीरज गुजर, अमित देशभ्रतार, कपिल चंदनखेडे, सतीश इंगळे, धीरज प्रभाकर, शेख सलीम, रवींद्र कांबळे, संतोष नाखले, आशीष सोनटक्के, विशाल मानकर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

















































