ब्लेडने वार करणाऱ्या आरोपीला कारावास! ४ वर्षे ९ महिन्यांची ठोठावली शिक्षा; जिल्हा न्यायालयाचा निर्वाळा

वर्धा : ब्लेडने वार करून जखमी करणाऱ्या आरोपीला ४ वर्षे ९ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. अमोल चिंदजी शेंदरे (रा. स्टेशन फैल, वर्धा) असे आरोपीचे नाव आहे. हा निर्वाळा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजय भारूका यांनी दिला.

माहितीनुसार आशिष आनंद रणधीर हा इयत्ता १२ व्या वर्गात शिक्षण घेत होता. १२ डिसेंबर २०१६ला रात्री ८:३० वाजताच्या सुमारास आशिष हा त्याचा मित्र सुगतानंद रंगारी याच्या सोबत किरण पारधे याच्या मटन शॉपसमोर बोलत उभा होता. दरम्यान, आरोपी अमोल हा तेथे आला व आशिषच्या मित्राला शिविगाळ करू लागला. आशिषने हटकले असता आरोपीने त्याला मारण्याची धमकी देऊन निघून गेला. त्यानंतर रात्री ११.०० वाजता अमोल आशिषच्या घरी गेला आणि घराबाहेर बोलावून त्याच्याशी वाद घातला.

या वादात झालेल्या झटापटीत आरोपीने ब्लेडने आशिषच्या डाव्या कानाखाली मानेवर व डाव्या बाजूला डोक्यावर तसेच डाव्या डोक्याच्यावर, कपाळावर आणि डाव्या हाताचा अंगठा व हातावर मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी शहर पोलिसात दाखल तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सहा. पोलिस निरीक्षक एन. एस. रामटेके यांनी केला. सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता प्रसाद सोईतकर यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणात पोलिस कर्मचारी देवेंद्र कडू यांनी साक्षीदारांना हजर करून मोलाची कामगिरी बजावली. शासनातर्फे एकूण १० साक्षीदार तपासले. तक्रारकर्ता आशिष याचा इतर दुसऱ्या कारणाने खून झाल्याने तो मरण पावला. त्यामुळे प्रकरणात त्याची साक्ष नोंदविण्यात आली नाही. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सय्यद सिध्दत अली, अजगर अली, सुगतानंद रंगारी, शेख शाहबाज शेख रहमान, वैद्यकीय अधिकारी व इतर साक्षीदार यांची साक्ष, सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून शिक्षा सुनावण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here