वृद्धाच्या पायावरून गेले ट्रकचे चाक! रुग्णालयात नेताना मृत्यू; सालोड मंदिराजवळील अपघात

वर्धा : ऑटोतून प्रवासादरम्यान भरधाव ट्रकने कट मारल्याने ऑटोत बसलेला वयोवृद्ध रस्त्यावर पडला. दरम्यान ट्रकचे मागील चाक वृद्धाच्या पायावरगेल्याने तो जखमी झाला. तर ऑटोतील इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना सालोड गावाजवळ घडली. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी वयोवृद्धाला रुग्णालयात उपचारार्थ नेत असतानाच त्याचा वाटेत मृत्यू झाल्याची माहिती सावंगी पोलिसांनी दिली.

मसाजी मरीम सुरुसे (६५) रा. धानमुख, ता. उमरखेड, जि. यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे. तर रेखा गावड ही जखमी झाली. दुर्गा रूपराव गावड, शोभा गावड, रेखा गावड तिन्ही रा. नागपूर आणि एक मुलगा हे चौघे एम. एच. ३१ सीव्ही. ५४२५ क्रमांकाच्या ऑटोतील मागच्या सीटवर बसून होते. तर मृतक मसाजी सुरुसे हा चालकाच्या बाजूला बसून होता. मागाहून भरधाव येणाऱ्या ट्रकचालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून ऑटोला कट मारला. दरम्यान ऑटोचालकाच्या बाजूला बसलेले मसाजी हा रस्त्यावर पडल्याने त्याच्या दोन्ही पायावरून ट्रकचे मागील चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला. तर मागील सीटवर बसून असलेल्या रेखा गावड यांना किरकोळ मार लागला. दुर्गा गावड यांच्या तक्रारीवरून अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध सावंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here