शेतातील झोपडीत पुरले होते वाघाचे ४ दात आणि १७ नखे! वनविभागाने जप्त केले वन्यजिवाचे अवयव

वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील मौजा पवनगाव येथील वाघाच्या शिकारप्रकरणी वनविभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यामधील महालगाव (खुर्द) येथून अविनाश भारत सोयाम (३४) याला अटक केली आहे. सोयाम हा या प्रकरणातील मुख्य आरोपीस आहे. यानेच त्याच्या शेतातील झोपडीत वाघाचे चार दात अन् तब्बल १७ नखे पुरवून ठेवली होती. वाघाचे हे अवयव वनविभागाने गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी धडक कारवाई करून जप्त केले आहेत.

चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यातील महागाव (खुर्द) शेत शिवारात तारेच्या कुंपनात विद्युत प्रवाहित करून वाघाची शिकार करण्यात आली होती. यानंतर आरोपीने वाघाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच भागातील एका पडीक शेतजमिनीवर वाघाचा मृतदेह नेला. पण यश न आल्याने आरोपीने थेट चंद्रपूर जिल्ह्याची सीमा ओलांडली आणि वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मौजा पवनगाव येथील झुडपी जंगल गाठले. याच ठिकाणी आरोपीने वाघाच्या मृतदेहाचे तुकडे फेकून देत यशस्वी पळ काढला. शिवाय काहीच झाले नाही, असे दर्शवित तो आपल्या दैनंदिन कामात व्यस्त झाला होता.

पण नंतर १४ तुकड्यातील वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने वनविभागही ॲक्शन मोडवर आला. तब्बल १४ तुकड्यांत वाघाचा मृतदेह सापडला. पण वाघ नखे आणि दात सापडले नाही. हे लक्षात येताच नक्कीच हा प्रकार शिकारीचा असल्याचा अंदाज वनविभागाकडून बांधण्यात आला. यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांत वनविभागाने मुख्य आरोपी अविनाश भारत यास अटक करून वनकोठडी मिळविली.

वनकोठडीत असलेला आरोपी अविनाश तपासी अधिकाऱ्यांना पाहिजे तसे सहकार्य करीत नसला तरी वनविभागाने पुन्हा आपले सूत्र हलविले. त्यानंतर बुधवारी उपवनसंरक्षक राकेश शेपट यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक अमरजीत पवार यांच्या नेतृत्त्वात समुद्रपूरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली बारेकर, वनपाल विजय धात्रक, वनरक्षक योगेश पाटील, एम. डी. किटे, रमेश चोखे, विजय दिघोळे, सुरेखा तिजारे, शरद ओरके, अविनाश बावणे, अनिल जुमडे, रितेश भानुसे यांनी चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यातील महालगाव (खुर्द) गाठून वाघाची चार दात व १७ नखे जप्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here